Sunday, 20-05-2012   
 
 
श्री मोरया गोसावी समाधी मंदिर


मोरया गोसावी व चिंचवड देवस्थान


'गणपती बाप्पा मोरया' या जयघोषात ज्यांचे नाव आपण गणेशाच्या बरोबरीने घेतो ते मोरया म्हणजे चिंचवडचे निस्सिम गणेशभक्त मोरया गोसावी.
मोरया गोसावींचे पूर्वज कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील शाली या गावचे. त्यामुळे त्यांना शालीग्राम या नावाने ओळखत. मोरयांचे वडील वामनभट शालीग्राम व माता पार्वतीबाई हे कर्नाटकातून मोरगावला आले. तेथे त्यांनी मयुरेश्वराची भक्ती केली. मोरयाच्या आशीर्वादाने पार्वतीबाईंच्या उदरी माघ वद्य चतुर्थी शके १२९७ (इसवी सन १३७५) या शुभदिनी मोरयांचा जन्म झाला.

धार्मिक वातावरणात बालपण गेल्यानंतर मोरया थेऊरला आले. तेथे त्यांना नयनभारती हे गुरु लाभले. तेथे त्यांनी तपश्चर्या केली. त्यामुळे त्यांनी सर्व इंद्रियावर विजय मिळवला. गो म्हणजे इंद्रिये आणि त्यावर विजय मिळविणारा म्हणजे स्वामी म्हणून तेथून पुढे मोरयांना गोस्वामी म्हणून ओळखू लागले. तेथे लौकिक वाढला पण एकांत मिळेना म्हणून मोरया गोसावी भ्रमंती करत पवनेकाठी थेरगावजवळील जंगलात किवजाई मंदिरात राहू लागले पण त्यांची कीर्ती चिंचवडकरांना कळली. त्यांनी आग्रह करुन त्यांना चिंचवडला आणले. तेथे त्यांनी कोठारेश्वर मंगलमूर्तीची स्थापना केली.

मोरया गोसावी हे महासाधू होते. त्यांचे अनेक चमत्कार प्रसिद्ध आहेत. त्यांच्यानंतर सात पिढ्यांमध्ये देवत्वाचा अंश होता असे म्हणतात. या सर्व संत पुरुषांच्या समाध्या चिंचवडला पवनेकाठी आहेत. मोरया गोसावींच्या समाधी दर्शनासाठी बहुसंख्य गणेशभक्त आणि भाविक येत असतात. चिंचवड देवस्थानला अनेक राजेमहाराजांनी वतन, देणग्या दिलेल्या आहेत. पेशवाईत देवस्थानला टांकसाळ चालविण्याची परवानगी होती. देवस्थानतर्फे धार्मिक उत्सवाबरोबरच संगीत महोत्सव व अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सध्या संस्थानतर्फे अनेक विकासकामे सुरु असून देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्रमहाराज देव हे आहेत.
 
Search
Area
Category
 

This site is owned by Pimpri Chinchwad Infomedia Pvt.Ltd;
Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar statue, Off Mumbai-Pune Highway, Kharalwadi, Pimpri, Pune-411018.
Phone no. @ 2742 42 02. Email:pciplindia@gmail.com
© All rights reserved