शहराची माहिती
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणा-या पुणे शहरापासून जवळच उदयाला
आलेले आणि औद्योगिकरणामुळे विकसित झालेले एक समृद्ध शहर पिंपरी-चिंचवड.
पुण्यक्षेत्र देहू-आळंदीचे सन्निध्य. महासाधू मोरया गोसावींच्या वास्तव्याने पावन झालेली
ही भूमी. क्रांतिकारक चाफेकरांची जन्मभूमी. या भूमीत औद्योगिकीकरणाला अनुकूल वातावरण
लाभले. औद्योगिकीकरणाबरोबरच शहराची वाढ झाली आणि अवघ्या तीन दशकातच इथल्या खेडेगावांचे
महानगरात रुपांतर झाले.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये समाविष्ट असलेल्या गावांपैकी पिंपरी व चिंचवड ही दोन गावे.
दळणवळण आणि भौगोलिक दृष्ट्या महत्वाची म्हणूनच शहराला पिंपरी-चिंचवड हे जुळे नाव दिले.
या गावांच्या नावाच्या उत्पत्तीविषयी असे म्हटले जाते की, या परिसरात पूर्वी चिंच,
वड, पिंपळ यांची खूप झाडे होती. चिंच आणि वड या झाडांवरून चिंचवड हे नाव रुढ झाले.
पिंपळ या झाडावरुन पिंपरी हे नाव पडले. अशाप्रकारे पवनेकाठी असलेल्या या वृक्षांवरुन
ही नावे रुढ झाली असे म्हणतात.